निमगावची ऐतिहासिक गढी भिमानदीच्या निळ्याभोर पाण्याच्या प्रवाहाला खेटूनच ही निमगावची ऐतिहासिक गढी आहे. कोरोना संसर्ग प्रमाण कमी झाल्याने व नुकतीच या आजारावर लस आल्याच्या वृत्ताने जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. दि.१६ जानेवारी २०२१ ला सकाळी ८ वाजता मी पुण्याहून (कात्रज) येथून चाकणला निवासी असणारे आमचे लेखक मित्र श्री.मनोहर मोहरे यांच्याकडे निघालो. भेटीचे नियोजन व इतर चर्चा अगोदरच झाली होती. कात्रज मधेच एका दिवसाचा ७० रुपयेचा बसचा पास घेतला. सकाळी ९ वा.भोसरी येथे पोहोचलो तर राजगुरुनगरला जाणारी बस त्वरित मिळाली. आंबेठाण चौकात ९:४५ ला पोहोचलो. मग मोहरे सरांना मी तेथे उतरल्याचे चलभाषवरून कळविले व ते लगेचच दुचाकी घेऊन आले. मग आमचा दुचाकीचा प्रवास सुरू झाला. भिमानदी पार करून निमगाव येथे पोहोचलो. राजगुरुनगर पासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. गावाचे प्रवेशद्वारासमोर असलेल्या उपहारगृहात गरमा गरम चहा घेतला व प्रवासाचा काहीसा आलेला थकवा घालविला. मग गावातील ऐतिहासिक गढी/ वाडा पाहण्यास निघालो. पूर्वीच्याकाळी संपूर्ण गावाला तटबंदी असावी हे पुरातन गाव प...